Friday, June 19, 2015

.......मनं पाऊस पाऊस !

​​नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं

अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात……. 

 


​ …….अगदी वेळेवर आलास बघ यावर्षी. तू येण्याआधी हुरहूर लागून राहिली होती बघ, म्हंटल येतोस कि नाही यावेळी तरी लवकर. ऊन 'मी' म्हणत असलेलं. घामाच्या धारांनी तर पुरतं नको करून सोडलेलं. मध्यंतरी तू लांबणीवर जाण्याच्या बातम्या येऊन गेल्या. उगाच मन कावरंबावरं झालेलं, वाटलं तू पुन्हा वाट पाहायला लावणार कि काय?…….

…….आणि अचानक त्यादिवशी अंधारू लागलं, नभ दाटून आलं, थंड वाऱ्याची झुळुक तुझ्या येणार असल्याचा इशारा देऊन गेली. क्षणात बदललेल्या वातावरणाने मन मोहून गेलं, प्रसन्न वाटू लागलं, आणि तू आलास, बरसलास, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर अगदी ठरलेल्या दिवशी शाळा सुरु व्हावी त्याप्रमाणे पाहिल्याच दिवशी हजेरी लावलीस.

हुश्श्श्श्श्श…….प्राणी, पक्षी, माती, माणसं, डोंगर, नद्या, शेतं सगळ्यांनीच एक नि:श्वास टाकला. तुझ्या येण्याने सगळेच सुखावले. सगळ्यांनाच वेड लावणारा तू……. मी तरी तुझ्यापासून अलिप्त कसा राहू? मला तर तू खूप पूर्वीच वेडं लावलयस. आता आठवत नाही नक्की कधीपासून तुझ्या प्रेमात पडलोय. पण 'चातका' सारखा दरवर्षी तुझ्या येण्याकडे डोळे लावून बसतो. आणि तू आलास कि तुझ्या येण्याने वेडा होऊन जातो……. पहिल्या थेंबाने येणारा मातीचा गंध श्वासात भरून घेतो……. चिंब-चिंब भिजून घेतो……. धुक्यात स्वतःला हरवून घेतो……. पाऊस जगून घेतो.

……. तू आल्यानंतर आज तिसऱ्यांदा भिजून आलोय, उगाच वाट फुटेल तिथे भटकून आलोय. थंडगार वारा, रिमझिम कोसळणाऱ्या धारा पुन्हा-पुन्हा अंगावर घेऊन आलोय. पण इतक्यातच मी समाधान थोडचं मानणार? आत्ताशी तर आलायस, 'अभी तो शुरुवात है'. अजून भरपूर भिजून घ्यायचयं. कोसळणारा पाऊस, गरमा-गरम कांदा भजी, चहा आणि सोबतीला चार-पाच टाळकी. …….चल, लागतोच आता पुढच्या प्लान्सच्या तयारीला. …….येतोय पुन्हा: तुझ्यात हरवून जायला.……. !










सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री

Wednesday, June 10, 2015

कातळ-कोरीव पायऱ्यांचा…….कलावंतीण !

​​
.......उंचच उंच कातळ, दऱ्यान मधून भणाणणारा वारा .......माती, झाडा-झुडुपांचा तो मन वेडावणारा गंध .......थकवणारे, घामट काढणारे कातळ-टप्पे .......निसरडी दगड-माती .......उंच कड्यावर बसून न्याहाळलेला नजरेत येईल तिथपर्यंतचा प्रदेश आणि आसमंत.......

.......हे सगळ पुन्हा-पुन्हा अनुभवायचं, डोळ्यांत, श्वासात भरून घायचं .......कुठल्याश्या खोपट्यात बसून पिठलं-भाकरीवर ताव मारायचा आणि मस्त जमिनीवर पाठ टेकायची .......भटक्यासाठी यापेक्षा मोठ सुख ते काय ???

'हापिसातल्या' एसीत अनं घरातल्या पंख्याखाली हे सुख थोडंच मिळणार? .......'उगाच भटकून' (हे घरच्यांच्या भाषेत) बरेच दिवस लोटलेले, आता पुन्हा डोंगर-दऱ्यातं भटकायला जायचं, या नुसत्या विचारानेच उत्साह वाटू लागलेला.......
.......मग काय उचलली ​सँक, अनं वाट चालू लागलो, पुन्हा एकदा त्याच्या दिशेने .......सह्याद्री .......माझा सांगाती !


माथेरान डोंगररांगेत येणारा पनवेल जवळचा कलावंतीण सुळका आणि त्याच्या प्रबळगडावरून दिसणाऱ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या याचं विशेष अप्रूप मनात होत.

.......यावेळी या उंच सुळक्यावरून निसर्गाच विलोभनीय दृष्य न्याहाळायचं, अनुभवायचं हे पक्कं केलं. बरोबर चिनू, निलेशही तयार झाले. स्वप्न्या, तेज, निखिल आणि इतर डोंगरमित्र माणिकगडाकडे निघालेले, अनपेक्षितपणे पनवेल बस डेपोत भेटले. पनवेलहून लाल डब्यात चढलो. तुरळक एक-दोन डोकी, बाकी 'यष्टी' रिकामी, तिघेही ऐसपैस बसलो. साधारण अर्ध्या तासात पायथ्याच्या गावी पोहोचलो.


ठाकूरवाडीत उतरताच मागे दिसला तो उंच, अजस्त्र , विस्तीर्ण पठार असलेला किल्ले मुरंजन म्हणजेच प्रबळगड आणि डाव्या बाजूचा सुळका कलावंतीण. माथेरानच्या सनसेट पॉइंट वरून दिसणारा सूर्यास्त दिसतो, तो याच दोहोंच्या बेचक्यात. 

शहराच्या बऱ्याच जवळ असल्याने गावातल्या बऱ्याचश्या शेतजमिनी 'सेकंड होम' वाल्यांनी कुंपण घालून ठेवलेल्या. 'निसर्गात जा', हे 'या' लोकांनी जरा जास्तच सिरिअसली घेतलंय. :) 

गावातून जाणारा एक बऱ्यापैकी मोठा रस्ता साधारण १५-२० मिनिटात डोंगराच्या पायथ्याशी नेऊन सोडतो. इथं शिव सह्याद्री संस्थेने गडाची माहिती देणारा फलक लावला आहे, जो सध्या बिकट अवस्थेत आहे. इथून पुढचा प्रवास पायवाटेने करायचा.

सक्काळ-सकाळी रानातून सरपणासाठी लाकड गोळा करून, मोळ्या बांधून आणणाऱ्या काही गावकरी स्त्रिया दिसल्या .......अनं आठवली ती शेणाने सारवलेली चूल, सरपण जळतानाचा धूर आणि गंध.......

पुढे प्रबळमाची पर्यंत जाणारी वाट बऱ्यापैकी चांगली आहे, कधी सपाटी, कधी चढाई, तर कधी घामट काढणारी. सूर्यदेव हळूहळू वर येऊ लागलेला, तसा अवघा सह्याद्री आणि चोहोबाजूंचा भूप्रदेश कोवळ्या किरणांत न्हाऊन निघालेला.......जस-जसे वर चढू लागलो तस-तसा लांबवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येऊ लागला.......

थोडं पुढ गेल्यावर दिसल्या त्या कातळात कोरून ठेवलेल्या, शेंदूर फासलेल्या दोन सुंदर मूर्त्या…… एक 'गणेशाची' तर दुसरी 'अंजनी सूताची' .......दोन्ही मूर्त्यांच्या मध्ये दगडात एक घंटा अडकवून ठेवलेली. पायातले शूज काढले आणि मनोमन वंदन केलं. तिथेच जरा पाणी प्यायलो, दोन क्षण थांबून मग निघालो. निघताना मनात आलं, कुणी-कधी कोरल्या असतील इथे या मुर्त्या? .......सध्या तरी माहित नाही.

थोडं चढून पुढे गेल्यावर झाडाच्या सावलीच्या ठिकाणी एक खुर्ची टाकून बसलेला एक तरुण दिसला. न विचारताच त्याने माहिती द्यायला सुरुवात केली, 'प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्थे'तर्फे संकट प्रसंगी पर्यटकांना मदत पोहोचवली जाते. संस्थेकडून प्रत्येक पर्यटकामागे १० रुपये घेतले जातात, त्याची पावतीही दिली जाते. आणि हा निधी आदिवासी गावाच्या विकासासाठी वापरला जातो. एका अर्थाने अशा प्रसंगी मदत पोहोचवण, खरोखरच स्तुत्य आहे.

तिथून पुढे निघालो तो अजून प्रबळमाची यायची होती. मुरंजन च्या पठारामागून सूर्य हळूहळू आपले दर्शन देत होता…….

सणकून भूक लागलेली, प्रबळमाचीत पोहोचताच कांदे-पोह्यावर ताव मारला. चहाने सगळा क्षीण जाऊन तरतरी आली. हा चहा पण काय चीज आहे? कितीही कंटाळा येवो, थकवा येवो, एक घोट घेतला कि हुरूप येतो, नाही? ज्याने हे अजब रसायन शोधून काढलं त्याला खरंच सलाम !
आता इथून पुढे उजवीकडची वाट प्रबळगडा कडे तर डावीकडची कलावंतीण कडे गेलेली. आदल्या रात्री वस्तीला गेलेले काही डोंगरमित्र उतरताना भेटले, औपचारिक ओळख परेड झडली. साधारण अर्ध्या-पाउण तासात दाटीवाटीच्या झाडीतून आणि निसरड्या दगड-मातीतून, चढाईच्या वाटेने हाश-हूश करत प्रबळ आणि कलावंतीणच्या मधल्या खिंडीत येऊन पोहोचलो. समोर पाहतो तर कलावंतीणचा तो उभा अजस्त्र पहाड काळजात धस्स करून गेला. वैशिष्ट्य म्हणजे कातळात खोदून काढलेल्या उभ्या पायऱ्या सहजासहजी दिसत नाहीत.

…….चढाईला सुरुवात केली तशी कातळातल्या या उभ्या पायऱ्यान्नी भुरळच पाडली. पायऱ्या अप्रतीम कोरून काढल्या आहेत, ओबड-धोबडपणा बिलकूल नाही, एक-एक पायरी साच्यामध्ये घडवल्यासारखी. इतक्या अवघड ठिकाणी कुणी आणि कशा खोदून ठेवल्या असतील ? काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अरुंद.
पायऱ्या चढताना एका बाजूला कातळभिंत तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. मागे वळून पहायची सोय नाही, डोकं नक्कीच गरगरणार.

पायऱ्या चढून गेल्यावर थोड्या सपाट जागेवर पोहोचलो. इथून पुढे एक पायवाट शेवटच्या कातळ टप्प्याकडे गेलेली. इथे कोणत्याही पायऱ्या नाहीत, कातळाचे होल्ड्स घेऊन वर पोहोचायचं, रोप असेल तर उत्तम.

आमच्याकडे रोप नव्हता पण आधी आलेल्या एका ग्रुपने रोप लावून ठेवलेला, त्याचा आधार घेऊन अंतिम टप्पा गाठला.
.......सुळक्यावर कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत, माथाही लहान पंचवीस-तीस माणसं बसतील इतका. पण इतक्या अवघड ठिकाणी पायऱ्या खोदून वाट केली आहे, याचा अर्थ इथे नक्कीच काहीतरी असावं, बहुदा जे आज काळाच्या ओघात लुप्त झालंय. पण काय होत नक्की?, कसं होत?, कसं घडवलं असेल? प्रयोजन काय? एक ना अनेक प्रश्न मनात येऊन गेले. ऐतिहासिक कागदपत्र, 'gazetteers' मध्येही याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.



.......इथून नजरेत येत होता तो क्षितिजापर्यंत पसरलेला विस्तीर्ण भूप्रदेश, निळशार आभाळ, पायथ्याची वस्ती, तर तीनही बाजूस पसरलेल्या सह्याद्रीच्या लांबच-लांब पर्वतरांगा, खोल दऱ्या, आणि समोरच विस्तीर्ण पठार आणि घनदाट जंगल असलेला अजस्त्र प्रबळगड. इथल्या भणाणणाऱ्या वाऱ्याने मंत्रमुग्ध करून सोडलं. सह्याद्रीच हे रौद्र-विराट सौंदर्य डोळ्यात भर-भरून घेतलं, वारा पिऊन घेतला, शिवगर्जना दिली आणि तिथेच थोडा वेळ पाठ टेकली .......काही क्षण सगळ काही विसरून गेलो .......हरवलो .......उरलो फक्त सह्याद्री आणि मी.......



सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री