ग्रीष्मातलं करपवणारं ऊन……. सुकलेली, स्तब्ध पहुडलेली झाड-झुडुपं अधिकच
रुक्ष भासणारी……. खोल गेलेल्या विहिरी, वसुंधरेच्या उदरात लुप्त झालेल्या
नद्या अनं निर्झर……. कुठल्याश्या कोपऱ्यात शुभ्र नभ पसरून बसलेलं स्वछ
निळंशार नभांगण……. उन्हाची काहिली सोसत निपचित पडलेलं एखाद अरण्य
नेहमीपेक्षा मोकळ भासणारं……. तिथले निसर्गाशी प्रामाणिक असलेले अनं
आपल्याच विश्वात मश्गुल राहणारे लहान-थोर जीव……. स्थितप्रज्ञासारखा समोर
उभा ठाकलेला सह्याद्री……. अनं त्या उघड्या रानांतून तिथपर्यंत घेऊन जाणारी
ती पायवाट आता अधिकच स्पष्ट दिसू लागलेली……. अशात ग्रीष्मातल्या एखाद्या
सकाळी उगवतीला अचानक दाटून आलेले ढग……. अनं त्या मळभा सोबत मनाला वेध
लागतात तुझ्या येण्याचे……. तू इतक्यात येणार नाहीस हे ठाऊक असतं, पण वेड मन
तरीही तुझी वाट पहात, क्षितिजाकडे डोळे लावून बसतं……. हे मळभ फक्त काही
वेळच असत, पण तरीही मला ते आवडतं कारण ते आठवण करून देतं तू येण्याआधीच्या
दिवसाची, दाटलेल्या मेघांची, सुटलेल्या वाऱ्याची, कडाडणाऱ्या विजांची,
डोलणाऱ्या झाडांची, पक्षा-पाखरांच्या च्या लगबगीची, आपण एकत्रितपणे
अनुभवलेल्या त्या प्रवासांची, हसऱ्या आनंदी सुखाची तर कधी बरसलेल्या
सरींबरोबर वाहून गेलेल्या दु:खाची, मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या त्या सर्वच
क्षणांची……. वाट पाहतोय तू येण्याची……. मग, येतोयस ना लवकर ?

No comments:
Post a Comment