Monday, June 6, 2016

तुझ्यात तू अन माझ्यात हरवलेलो मी.....

निःशब्द तू, निःशब्द मी, अथांग तू, अथांग मी, तुझ्यात तू अन माझ्यात हरवलेलो मी.....

       पूर्वेस उत्तुंग उभा सह्याद्री तर पश्चिमेस क्षितिजापार पसरलेला सिंधूसागर, कुठे दोघांत मैलोनमैलांच अंतर तर कुठे बिलगून एकमेकांत हरवून गेलेले..... स्थितप्रज्ञ वाटावेसे..... सह्याद्री भव्य, रौद्र, बेलाग, उत्तुंग जणू वर्षानूवर्षांच्या तपश्चर्येस बसलेला ​ योगी, त्याच्या नुसत्या तेजानेच प्रभावित करून सोडणारा, भव्यतेत भान विसरून जायला लावणारा….. तर सिंधुसागर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला, विशाल, गूढ, त्याच्या अथांगतेत हरवून जायला लावणारा. याच्या अंतरंगाचा ठाव कोणासही नाही. जसा मनाचा ठाव घेणं अवघड तसंच याच्या गूढ गर्भाच आकलन अशक्य. सह्याद्री आणि भटाक्याचं नातं जसं अतूट तसंच या सिंधूसागरा सोबतचं नातंही जन्मांतराच. त्याच्या किनाऱ्यावर येणाऱ्या अगणित लाटां आणि मनात येणारे असंख्य विचार यात कमालीची साम्यता. एका मागून एक येणाऱ्या लाटा, पहिली किनाऱ्याला लागत नाही तोवर मागोमाग दुसरी अन तिसरीही, प्रत्येक वेळी स्वतःसोबत काहीनाकाही घेऊन येणारी. मनातले विचारही तसेच एका मागोमाग मनपटलावर उमटणारे, सोबत आनंद, दुःख, राग, चिंता, प्रश्न यांचा पाऊस पाडणारे. किनाऱ्यावरच्या मऊसूत पुळणीवर अनवाणी चालायचं सुख काही औरच. क्षितिजावर मावळलेला रवि, संधीप्रकाशात घराकडे परतणारे पक्षांचे थवे, अनवाणी पायाखाली ओलसर झालेली वाळू, ओहोटीमुळे बाहेर दिसू लागलेला नुकताच न्हाऊन निघाल्यासारखा भासणारा काळाभिन्न खडक, त्या खडकातच विश्व असणारे अन खडकात जणू जिवंतपणा ओतणारे जीव, मध्येच कुठेतरी खडकाआडून उगवलेली समुद्र वनस्पती, इतस्तः विखूरलेले किनाऱ्याच्या वाळूत मिसळून गेलेले शंख-शिंपले, क्षणाचीही उसंत न घेता किनाऱ्याला लागणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांचा आवाज तिन्हीसांजेला अधिकच स्पष्ट होत जातो अन त्याबरोबर प्रत्येक लाटेसरशी असंख्य विचारांच्या पाशांतून मन मुक्त होऊ पाहातं. वाळूत उमटून मागे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक मानगुटीवर बसलेल्या नकोश्या विचारांचं ओझं मागे ठेवत हलकंस होऊन जात. या नितांत सुंदर कातरवेळी, अवघा रंग एकची होऊ पाहणाऱ्या सृष्टीत स्वतःला विसरून नाही गेलो तर नवल. सुख-दु:खाच्या कोणत्याही क्षणी या अथांग सागराशी गुज करता येत. कधी याच्यात मनसोक्त डुंबून घेत वाळूत लोळून घेता येत तर कधी दूर किनाऱ्यावर उभं राहून नुसतंच त्याच्याकडे पाहात माझ्याच अंतरंगात डोकावता येत. माझ्यातच हरवलेलो मी याच्या हाकेला नक्की ओ देतो, अंतरंगात स्वतःला शोधून घेतो. डोक्यात जखडलेल्या अहं विचारांच्या पाशांना दूर सारायच असेल तर एखाद्या कातरवेळी या पुळणीवर चालून पाहायला हवं, मनांत साचलेल्या किल्मिशांना लाटेसरशी किनाऱ्यावर सोडून द्यायला हवं, क्षणोक्षणी गर्द होत जाणाऱ्या गहिऱ्या रंगात हरवून जायला हवं.

© भटक्या योगी | मे २०१६

Friday, May 20, 2016

मळभ.......



ग्रीष्मातलं करपवणारं ऊन……. सुकलेली, स्तब्ध पहुडलेली झाड-झुडुपं अधिकच रुक्ष भासणारी……. खोल गेलेल्या विहिरी, वसुंधरेच्या उदरात लुप्त झालेल्या नद्या अनं निर्झर……. कुठल्याश्या कोपऱ्यात शुभ्र नभ पसरून बसलेलं स्वछ निळंशार नभांगण……. उन्हाची काहिली सोसत निपचित पडलेलं एखाद अरण्य नेहमीपेक्षा मोकळ भासणारं……. तिथले निसर्गाशी प्रामाणिक असलेले अनं आपल्याच विश्वात मश्गुल राहणारे लहान-थोर जीव……. स्थितप्रज्ञासारखा समोर उभा ठाकलेला सह्याद्री……. अनं त्या उघड्या रानांतून तिथपर्यंत घेऊन जाणारी ती पायवाट आता अधिकच स्पष्ट दिसू लागलेली……. अशात ग्रीष्मातल्या एखाद्या सकाळी उगवतीला अचानक दाटून आलेले ढग…….  अनं त्या मळभा सोबत मनाला वेध लागतात तुझ्या येण्याचे……. तू इतक्यात येणार नाहीस हे ठाऊक असतं, पण वेड मन तरीही तुझी वाट पहात, क्षितिजाकडे डोळे लावून बसतं……. हे मळभ फक्त काही वेळच असत, पण तरीही मला ते आवडतं कारण ते आठवण करून देतं तू येण्याआधीच्या दिवसाची, दाटलेल्या मेघांची, सुटलेल्या वाऱ्याची, कडाडणाऱ्या विजांची, डोलणाऱ्या झाडांची, पक्षा-पाखरांच्या च्या लगबगीची, आपण एकत्रितपणे अनुभवलेल्या त्या प्रवासांची, हसऱ्या आनंदी सुखाची तर कधी बरसलेल्या सरींबरोबर वाहून गेलेल्या दु:खाची, मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या त्या सर्वच क्षणांची……. वाट पाहतोय तू येण्याची……. मग, येतोयस ना लवकर ?

Friday, February 19, 2016

शिवजयंतीच्या निमित्ताने.......



.......ब्लॉगिंग ला सुरुवात करून आज वर्ष झालं. ​वर्षभरात फार काही लिहिणं झालं नाही, जेमतेम आठ पोस्ट्स. पण काही नवीन करून वर्ष लोटल्याने या दिवशीच्या आठवणी जाग्या झाल्या.

 .......प्रविण अनं मी दोघेही hangout वर होतो, तसे नेहमीच असायचो, एक-दोन दिवसाआड वेळ मिळेल तस मनसोक्त गप्पा मारत बसायचो. आणि त्यादिवशी शिवजयंती म्हणून सकाळीच शुभेच्छा देऊन झाल्या. बोलता-बोलता विषय निघाला कि आज काहीतरी करायला हवंय, पण दोघेही ऑफिसला आल्याने, आता काय करणार असा प्रश्न.

प्रविण : "काही सामाजिक कार्यच होत नाहीये रे."
मी मस्करीच्या सूरात म्हंटल "होतंय ना, चेक पाठवतोय ना आपण."
प्रविण : "हो, पण तेवढंच, प्रत्यक्षात काहीच होत नाहीये."
मी : "त्यासाठी वेळ द्यावा लागेल आपल्याला, विचार करू अनं काढू काहीतरी मार्ग."
त्यानंतर ठाण्यातल्या एका ऐतिहासिक परीसंवादावर गप्पा आणि काही अवांतर गप्पा झाल्यावर आम्ही offline झालो. दुपारनंतर मी ब्लॉग लिहायला घेतला. विषयही त्या दिवसाचे औचित्य साधून घेतलेला… शिवजयंती! संध्याकाळ पर्यंत वेळ मिळेल तसा लिहून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी आल्यावर पहिल्यांदा प्रविणला ब्लॉग लिहितोय सांगून draft e-mail केला, आणि म्हंटलं check  कर अनं तुला वाटतंय तिथे corrections  कर. लगेचच त्याचा reply आला, "वाह!class…. सर्व छान आहे, no need to edit... go ahead dear, its new start...all d best... मोजक्या शब्दांत perfect message पोहोचवायचा."

 …….आज सकाळी उठल्या-उठल्या हे सर्व डोळ्यांसमोर तरळू लागलं. प्रविण… आज तू नाहीस यावर अजूनही विश्वास बसत नाहीये रे. हे सर्व एका अत्यंत वाईट स्वप्नासारखं वाटतंय. वाटतंय अजूनही मी झोपेत आहे अनं मला हे भयंकर स्वप्न पडलंय, अनं मला या स्वप्नातून जाग का येत नाहीये? वाटतंय हे स्वप्न भंगून तू समोर यावस अनं मी तूला कडकडून भेटावं. पण वास्तवाचं भान अधिकच दाहक अनं क्लेशदायक आहे. एकही क्षण असा जात नाहीये कि तुझी आठवण येत नाही, असंख्य आठवणींचा कल्लोळ माजतोय रे मनात. ठरवलेलं ना आपण खूप काही करायचं म्हणून?, मग असा का दूरावलास तू? आता सगळंच नीरस, दिशाहीन वाटू लागलंय. तरीही एक सांगू इच्छितो तूला, मागच्या वर्षीच्या शिवजयंतीत नवीन काही कराव म्हणून ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती आपण, यावर्षीच्या शिवजयंतीच्या निमित्ताने एक वचन देतो तूला, आपण एकत्रितपणे सुरु केलेल्या कार्यात कधीही खंड पडू देणार नाही मी… स्वराज्यवाटाच्या कार्याला कधीही अंतर देणार नाही… अगदी अखेरच्या श्वासापर्यंत.......

तुझा दुर्भागी मित्र,
भटक्या योगी

Wednesday, January 6, 2016

उर्ध्वमूखी भुयारीमार्गाचा....... कोथळीगड (पेठ चा किल्ला)

       नववर्षाचा पहिला दिन....... सरत्या वर्षाला निरोप देऊन ब्रम्ह मुहूर्तावर निघालेली भटक्यांची टोळी....... हेमंत-शिशिरातला लोभसवाणा गार वारा....... एक-दोन तास झोप मिळूनही भल्या पहाटेपासून सुरु झालेले ​गप्पांचे फड....... चुकून मागे राहिलेला आणि मागच्या ट्रेनने एकटाच दिड तास 'बोअरिंग' प्रवास करून आलेला ट्रेकमेट :)....... वाफाळता अमृततुल्य चहा....... गार रानवाऱ्याबरोबरच अंगावर घेतलेली सूर्याची कोवळी किरणं....... दुरून डोंगराच्या पोटातून खेचून काढल्यासारखा दिसणारा कोथळीगडाचा सुळका....... त्याच्या आतून खोदून काढलेल्या पायऱ्यांच मनातलं अप्रूप....... दिवसभराचं भटक्यांचं विविध विषयांच चर्चासत्र....... गडाचा जाणून घेतलेला रक्तरंजित इतिहास....... सो कॉल्ड 'थर्टीफस्ट पार्टीछाप' पब्लिकने केलेला कचरा साफ करून गडाची केलेली स्वच्छता....... अन् डोंगरमित्रांसोबतचा अविस्मरणीय 'ट्रेकानुभव'.......


दोन दिवसा पूर्वी कोथळीगड करायचं नक्की केलं. मावस भाऊ तन्मय अन् मी असे दोघेच तोपर्यंत भिडू होतो, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यंत तन्मय, तेज, शैलेश, अभिजित, विवेक अन् स्वप्निल मिळून सात जणं तयार झालो. सकाळी ४.२५ वाजता सिएसटीहून निघणारी पहिली खोपोली लोकल पकडायचं ठरवून सगळ्यांना तसं कळवलं. ठरल्याप्रमाणे स्वप्नीलने दादर, अभिजितने कुर्ला, मी-तन्मयने मुलुंड, तेजने ठाणे अन् विवेकने डोंबिवलीहून ट्रेन पकडली, तेही ठरल्याप्रमाणे खोपोलीकडचा सर्वात पहिला डब्बा, पैकी शैलेश ठाण्याहून तीच ट्रेन पकडण्यासाठी (खोपोली लोकल नेहमीच फास्ट असते असे समजून :D ) ​प्लॅटफॉर्म नं. ५ ला जाऊन बसला, अन् त्याची हि स्लो खोपोली चूकली. मग काय, एकटाच दहा मिनिटानंतरच्या कर्जतने दिड तासाचा 'बोअरिंग' प्रवास करून आला, आम्ही मात्र पोट धरून हसून घेतलं. सरत्या वर्षाला निरोप देण्याचे प्रत्येकाचे काही ना काही प्लान्स असल्याने रात्रीची झोप एक-दोन तासाच्या वर कुणाची झालीच नव्हती, तरीही पायथ्याला जाईपर्यंत गप्पांचे फड असे काही रंगले कि आत्ताच मस्त सात-आठ तास झोप काढून आलेत.  ट्रेकर्स लोकांचं एक बरं असतं त्यांना सोबत असलेला ट्रेकर ओळखीचाच पाहिजे असं नाही, फक्त 'ट्रेकर' या वळखिनं त्ये जीवाचं मैतर होऊन जातात.

कर्जतला उतरल्यावर डेपोत जाऊन 'यष्टी'ची विचारणा केली, तर तास-सव्वा तासाने आंबिवली 'यष्टी' होती, म्हणून मग टमटम करून आंबिवली गाठण्यावर शिक्कामोर्तब झालं. पण निघण्याआधी चहा नाही घेतला तर पुढं जाणं निव्वळ अशक्यच ओ, म्हणून मग मस्त वाफाळत्या चहाची फर्माईश सुटली, बरोबर टमटमवाल्या काकांनाही सामिल करण्यात आलं. आंबिवलीत दुर्गपालांच्या घरी चहा नाश्त्याची सोय होते हि माहिती काकांकडून मिळाली, मग नाश्ता तिथेच करायचं असं ठरवून आम्ही आगेकूच केली. या तासाभराच्या प्रवासात इतिहास, राजकारण, महाराजांचे वंशज, भूगोल, आजार-विकार, औषधनिर्मिती, भोंदूगिरी एक ना अनेक विषयांना उजाळा मिळाला. तासाभरात गार वारा अंगावर घेत आंबिवलीत पायउतार झालो ते थेट दुर्गपाल गोपाळ सावंत यांच्या घरासमोर. उतरताच पोह्यानबरोबरच पुन्हा चहाची फर्माईश. मस्त चहा-पोह्यानवर ताव मारल्यावर अगदी सज्ज झालो. निघण्याआधी दुपारच्या जेवणाचीही ​ऑर्डर सोडून आम्ही ध्येयाकडे वाटचाल सुरु केली.
प्रशस्त डांबरी रस्त्याने काही अंतर चालून गेल्यावर जिथे डांबरी रस्ता संपतो अन् कच्चा रस्ता सुरु होतो तिथे उजव्या बाजूस झाडावर कोथळीगडाकडे रस्ता दाखवणारा एक अगदी छोटा बोर्ड लावला आहे. इथून पूढली वाट, दगड-मातीची, सोपी, वळणावळणाची, घाटाची अन् दमछाक करणारी. साधारण अर्धा-पाऊण तास चालल्यानंतर कोथळीगड दृष्टीस पडला. त्याचा डोंगराच्या पोटातून खेचून काढल्यासारखा दिसणारा सूळका खूणाऊ लागला.
तिथून थोडं पूढे आल्यानंतर वाट खाली उतरू लागली व कोथळीगड दृष्टीआड गेला. मुख्य वाटेला मध्येच कुठे वळण तर नाही ना?, असं वाटून तेज अन् मी दोन्ही दिशांना थोडं पुढे आणि मागे पाहून आलो, आणि वाट योग्य असल्याची खात्री पटली. इथून साधारण अर्ध्या तासानंतर पेठ गावाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. इथं एका झाडाच्या चौथऱ्यावर गडाकडे कडे वाट दाखवणाऱ्या बाणाची खूण केली आहे. थोड्या वेळाच्या विश्रांतीसाठी थांबलो, तिळाचे लाडू अन् खजूरांचा फडशा पाडला. रॉक क्लायंबर तेजने क्लायंबिंग अन् रोप संदर्भात काही बेसिक गोष्टी उलगडल्या.
गावात एका घरवजा हॉटेल मध्ये पुन्हा एकदा बिनदूधाचा काळा चहा झाला, अन् आम्ही पेठ गावातल्या रस्त्याने गडाची वाट चढण्यास सुरुवात केली. गावात पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक पाईपलाईन थेट गडावरील पाण्याच्या टाक्यातून आणली आहे. हि पाईपलाईन गडावर जाणाऱ्या वाटेला समांतर आणली आहे. वाट दमछाक करणारी असली तरी झाडाझुडूपांतून जाणारी असल्याने आल्हाददायक होते.
 
साधारण अर्ध्या तासाने आम्ही मुख्य दरवाजापाशी घेऊन जाणाऱ्या पायऱ्यानपाशी येऊन पोहोचलो. मुख्य दरवाजाची बरीच पडझड झाली आहे. इथून डाव्या बाजूस पाण्याच्या टाकांचे समूह लागतात. त्यांना समांतर वाटेने गेल्यास वाट जिथे उजवीकडे वळते, तिथे सुळक्यात थोड्या वरच्या बाजूस आणखी एक छोटेखानी गुहा पहायला मिळते. इथे येणाऱ्या वाऱ्याने क्षणभर स्तब्ध झालो. याच वाटेने गडाच्या सुळक्याला प्रदक्षिणा करता येते.
प्रवेश द्वारातून समोरच दिसतात त्या कातळात खोदून काढलेल्या काही गुहा आणि मंदिर. सर्वात शेवटी आहे ती भैरोबाची प्रशस्त गुहा. या गुहेचे वैशिट्य म्हणजे आतील कोरीवकाम. छताला आधार देणारे खांब, आतील दरवाजा यावर अप्रतिम कोरीव काम केले आहे.
भैरोबाच्या गुहेपासून पुन्हा मंदिरापाशी आल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूस एक गुहा खोदलेली आहे, तिच्यात उजव्या बाजूस पण पृष्ठभागापासून खाली एक पाण्याचं टाकं आहे. याच गुहेत एक उर्ध्वमूखी भुयार आहे, प्रथमदर्शनी हे लक्षात येत नाही. या भूयारातूनच गडावर जाण्यासाठी पायऱ्या खोदून काढल्या आहेत.
भुयारातून जाणाऱ्या पायऱ्या गुडघ्या इतक्या उंच, दमछाक करणाऱ्या असल्या तरी एकंदरीत हा प्रवास थ्रिलिंग आहे. भुयाराच्या मार्गावर शेवटी एक कातळात कोरलेला दरवाजा अन् उजव्या बाजूस गजशिल्प व शरभशिल्प कोरलेलं आहे. इथून काही पायऱ्या चढून गडावर पोहोचलो. 
कोथळीगडाचा इतिहास - ट्रेकक्षितीज संस्था साभार

{औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्‍यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्र्‍यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्र्‍यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्‍यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले. दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्‍यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला. गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.}

माथ्यावर पाण्याची दोन टाकं वगळता काही अवशेष नाहीत. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील प्रदेश, सिद्धगड, गोरखगड, पदरगड, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरान हा दूरपर्यंतचा मुलूख नजरेत येत होता. सह्याद्रीच हे रांगड रूप डोळ्यांत भरभरून घेतलं. आता सगळ्यांनीच बरोबर आणलेल्या ​ड्राय स्नॅक्सवर ताव मारला. थोडी विश्रांती घेऊन गडफेरी मारून अन् मनासारख्या फ्रेम्स click करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 
गडमाथा चढून जायच्या आधी प्रवेश द्वारातून वर आल्यावर उजवीकडे गेल्यावर सपाट समतल जागा लागते, तिथे एक तोफ आहे, तोफेपासून अलीकडे काही अंतरावर काही 'थर्टीफस्ट पार्टीछाप' लोकांनी दारूच्या बाटल्या आणि काही बाटल्या फोडून टाकल्या होत्या, बहुदा सरत्या वर्षाला त्यांनी 'त्यांच्या पद्धतीने' निरोप देऊन नववर्षाचे 'स्वागत' (???) केले असावे. हा सर्व कचरा आम्ही गडमाथ्यावर जायच्या आधी प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवला होता, तो गड उतरताना बरोबर घेतला, अन् आंबिवलीत येऊन दुर्गपालांसमक्ष त्याची विल्हेवाट लावली. 
गड उतरत असताना मनात काही गोष्टी तरळत होत्या....... नोव्हेंबर १६८४ चा रणसंग्राम, 'हर हर महादेव' च्या गर्जनेने दणाणून सोडलेल्या दाही दिशा, शत्रूवर डागलेल्या तोफा, भाले-बाण यांचा दोहो बाजूंनी बरसलेला पाऊस, सळसळत्या पात्याने जमीनदोस्त केलेले गानिमांचे देह, बंदुकींच्या झडलेल्या फैरी, रक्ताचे वाहिलेले पाट, शेकडो मावळ्यांचे बलिदान……. अन् या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार कोथळीगड, आज बनलाय काही पार्टीछाप पब्लिकचा अड्डा. मराठ्यांच्या रक्तरंजित इतिहासाची साक्षीदार असलेली त्यापैकीच ती एक तोफ आज अनुभवतेय या 'सो कॉल्ड' लोकांची हि विकृती, दारूच्या बाटल्यांचा खच, फोडलेल्या बाटल्यांच्या काचा, उघड्या डोळ्यांनी पहातेय वैभवशाली इतिहासाची अवहेलना, पण जिथे मोठ-मोठ्या बलाढ्य आणि संरक्षित गड-दुर्गांची अशा विवंचेनेतून मुक्तता नाही, तिथे या छोटेखानी 'कोथळीगडास' कोण विचारतो?.......

परतून आंबिवलीत येईपर्यंत चार वाजले होते. आता सणकून भूक लागली होती. दुर्गापालांकडे पोहोचताच ​झक्कास चिकन थाळी वर यथेच्छ ताव मारला अन् गप्पांच्या फडामध्ये पुन्हा एकदा रंगून गेलो, नववर्ष दिनी आणखी एक अविस्मरणीय 'ट्रेकानुभव' गाठीशी बांधला गेला होता....... 

सर्व हक्क सुरक्षित  © !ncredible सह्याद्री, २०१६
गूगल मॅप व्हू - कोथळीगड