Monday, June 6, 2016

तुझ्यात तू अन माझ्यात हरवलेलो मी.....

निःशब्द तू, निःशब्द मी, अथांग तू, अथांग मी, तुझ्यात तू अन माझ्यात हरवलेलो मी.....

       पूर्वेस उत्तुंग उभा सह्याद्री तर पश्चिमेस क्षितिजापार पसरलेला सिंधूसागर, कुठे दोघांत मैलोनमैलांच अंतर तर कुठे बिलगून एकमेकांत हरवून गेलेले..... स्थितप्रज्ञ वाटावेसे..... सह्याद्री भव्य, रौद्र, बेलाग, उत्तुंग जणू वर्षानूवर्षांच्या तपश्चर्येस बसलेला ​ योगी, त्याच्या नुसत्या तेजानेच प्रभावित करून सोडणारा, भव्यतेत भान विसरून जायला लावणारा….. तर सिंधुसागर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला, विशाल, गूढ, त्याच्या अथांगतेत हरवून जायला लावणारा. याच्या अंतरंगाचा ठाव कोणासही नाही. जसा मनाचा ठाव घेणं अवघड तसंच याच्या गूढ गर्भाच आकलन अशक्य. सह्याद्री आणि भटाक्याचं नातं जसं अतूट तसंच या सिंधूसागरा सोबतचं नातंही जन्मांतराच. त्याच्या किनाऱ्यावर येणाऱ्या अगणित लाटां आणि मनात येणारे असंख्य विचार यात कमालीची साम्यता. एका मागून एक येणाऱ्या लाटा, पहिली किनाऱ्याला लागत नाही तोवर मागोमाग दुसरी अन तिसरीही, प्रत्येक वेळी स्वतःसोबत काहीनाकाही घेऊन येणारी. मनातले विचारही तसेच एका मागोमाग मनपटलावर उमटणारे, सोबत आनंद, दुःख, राग, चिंता, प्रश्न यांचा पाऊस पाडणारे. किनाऱ्यावरच्या मऊसूत पुळणीवर अनवाणी चालायचं सुख काही औरच. क्षितिजावर मावळलेला रवि, संधीप्रकाशात घराकडे परतणारे पक्षांचे थवे, अनवाणी पायाखाली ओलसर झालेली वाळू, ओहोटीमुळे बाहेर दिसू लागलेला नुकताच न्हाऊन निघाल्यासारखा भासणारा काळाभिन्न खडक, त्या खडकातच विश्व असणारे अन खडकात जणू जिवंतपणा ओतणारे जीव, मध्येच कुठेतरी खडकाआडून उगवलेली समुद्र वनस्पती, इतस्तः विखूरलेले किनाऱ्याच्या वाळूत मिसळून गेलेले शंख-शिंपले, क्षणाचीही उसंत न घेता किनाऱ्याला लागणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांचा आवाज तिन्हीसांजेला अधिकच स्पष्ट होत जातो अन त्याबरोबर प्रत्येक लाटेसरशी असंख्य विचारांच्या पाशांतून मन मुक्त होऊ पाहातं. वाळूत उमटून मागे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक मानगुटीवर बसलेल्या नकोश्या विचारांचं ओझं मागे ठेवत हलकंस होऊन जात. या नितांत सुंदर कातरवेळी, अवघा रंग एकची होऊ पाहणाऱ्या सृष्टीत स्वतःला विसरून नाही गेलो तर नवल. सुख-दु:खाच्या कोणत्याही क्षणी या अथांग सागराशी गुज करता येत. कधी याच्यात मनसोक्त डुंबून घेत वाळूत लोळून घेता येत तर कधी दूर किनाऱ्यावर उभं राहून नुसतंच त्याच्याकडे पाहात माझ्याच अंतरंगात डोकावता येत. माझ्यातच हरवलेलो मी याच्या हाकेला नक्की ओ देतो, अंतरंगात स्वतःला शोधून घेतो. डोक्यात जखडलेल्या अहं विचारांच्या पाशांना दूर सारायच असेल तर एखाद्या कातरवेळी या पुळणीवर चालून पाहायला हवं, मनांत साचलेल्या किल्मिशांना लाटेसरशी किनाऱ्यावर सोडून द्यायला हवं, क्षणोक्षणी गर्द होत जाणाऱ्या गहिऱ्या रंगात हरवून जायला हवं.

© भटक्या योगी | मे २०१६

4 comments:

  1. डोक्यात जखडलेल्या अहं विचारांच्या पाशांना दूर सारायच असेल तर एखाद्या कातरवेळी या पुळणीवर चालून पाहायला हवं, मनांत साचलेल्या किल्मिशांना लाटेसरशी किनाऱ्यावर सोडून द्यायला हवं, क्षणोक्षणी गर्द होत जाणाऱ्या गहिऱ्या रंगात हरवून जायला हवं. Kharach!!!

    ReplyDelete
    Replies
    1. पुन्हा एकदा ब्लॉगवर स्वागत मानिनी, अन आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

      Delete
  2. Replies
    1. ​ब्लॉगवर स्वागत अदिती​. रिप्लाय देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
      तुझ्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद !

      Delete