Friday, July 31, 2015

गुरुर्देवो सह्याद्री !

​       सह्याद्री....... उत्तुंग, गूढ, रम्य, दुर्गम, बेलाग, ​अतुल्य....... डोंगर-दऱ्यांत विसावलेल्यांचा पाठीराखा अन् माझा गुरुवर्य ! निसर्गात जावं, रमावं, त्याच्याशी एकरूप व्हाव हे शिकवलं ते यानेच. रोजच्या माणूस प्राण्यांच्या गर्दीत हरवून जाणारा मी धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून जेव्हा-जेव्हा सह्याद्रीत जातो, तेव्हा-तेव्हा तो उभा ठाकलेला असतो दर वेळी नव-नवीन काहीतरी शिकविण्यासाठी. कधी तो घेऊन जातो मला त्याच्या वैभवशाली इतिहासात....... कधी त्याच्या गर्भात दडलेल्या अनाकलनीय भूगोलात....... कधी घनदाट निबीड रानांत....... कधी स्तब्ध करायला लावतो त्याच्या जैवविविधतेत.......तर कधी हरखून जायला लावतो त्याच्या कोसळणाऱ्या जलप्रपातांत. जेव्हा-जेव्हा त्याच्या कुशीत विसावतो तेव्हा देहभान हरपून जातं. त्याचं रांगडेपण, दुर्गम कडे-कपाऱ्या, बेलाग सुळके अबोल राहून पण खूप काही शिकवून जातात. कसलासा अहंकार कधीच गळून पडतो आणि या जगात मी किती क्षुद्र आहे याची जाणीव होते. जगातल्या कुठल्याच शाळेत मिळालं नसतं ते शिक्षण मला त्याने दिल. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरुर्देवो सह्याद्रीला या भटक्याचा त्रिवार प्रणाम आणि हा छोटासा ब्लॉग त्यालाच समर्पित.......!



सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री 

Thursday, July 9, 2015

निसर्गाचा विलोभनीय कॅनव्हास उलगडणारा…….किल्ले सोंडाई !

​    कृष्ण-धवल मेघांत नटलेला आसमंत……. ​मळभात लपलेला सूर्य……. नुकत्याच अंकुरु लागलेल्या हिरवाईने नटू लागलेली वसुंधरा……. मेघ पिऊन ओलसर झालेली माती……. नुकताच न्हाऊन निघालेला काळाभिन्न कातळ, अधिकच गर्द भासणारा……. दगड-धोंड्यानतून वाट काढत खळाळू लागलेले निर्झर……. कुठल्याश्या वावरात नांगरु लागलेली सर्जा-राजाची जोडी……. तर कुठे लाल-तपकिरी माती आडून डोकावू लागलेले भात रोपाचे हिरवेगार गालिचे, वाऱ्याबरोबर डोलू लागताच हिरवी मखमल भासणारे……. मन धुंद करणारा रानवारा……. अनं जोडीला खेळ ऊन सावल्यांचा……

…….अशाच ऊन-सावल्यांच्या खेळात अविस्मरणीय ठरला ट्रेक सोंडाई. इथून सृष्टीचं मनोहारी रुप न्याहाळताना देह-भान नाही हरपलं तर नवलच. निसर्गाचा उलगडलेला हा विलोभनीय कॅनव्हास मनात कायमचं घर करून गेला.

डोंगरमित्र अव्या (अविनाश), दिलीप आणि आशिषसह सकाळी आठ वाजता कर्जत स्थानक गाठलं. सकाळचा नाश्ता केल्याशिवाय गाडी पुढे हाकणार कशी, म्हणून इडली-चटणी वर यथेच्छ ताव मारला (अर्थात तिथे दुसरं काही नव्हतंच) आणि त्यावर झक्कास वाफाळता चहा, अ:हाहाहा.  'आता गाडी कुट बी हाका कि राव, थकणार न्हाई अनं थांबनार बी न्हाई !'

कर्जतहून टमटम ने तीन किलोमीटरवरील बोरगाव फाट्यावर चौकटी पायउतार झाली. इथून पुढला प्रवास अकरा नंबरच्या गाडीने तोही प्रशस्त डांबरी सडकेने.


काही अंतर चालून गेल्यावर मोरबे धरणाचा जलाशय आणि समोरच उभा असलेल्या उत्तुंग इरशाळगडाने लक्ष वेधून घेतले. जलाशय आणि इरशाळचं हे दृश्य अप्रतिमच…….

पुढल्या वळणावर भेटली ती नांगरणी करणारी जीवा-शिवाची बैल जोडं आणि अवघ्या जगाचा अन्नदाता बळीराजा……. मनात तरळल्या त्या कवितेच्या ओळी, 'सुंदर ते ध्यान उभे बांधावरी, नांगर खांद्यावरी घेवोनिया…….'

तर दुसऱ्या बाजूस दृष्टीस पडला वसुंधरेच्या लाल-तपकिरी फरशीवर अंथरलेला हिरवाकंच गालिचा……. वाऱ्याबरोबर तरंग उमटू लागताच मखमलीलाही लाजवेल इतका विलोभनीय……

जलाशयापासून बऱ्यापैकी पुढे आल्यावर वाट सुरु होते ती चढणीची अन वळणावळणाची……
तासा-दीड तासाच्या सोप्या चालीनंतर सोंडेवाडीत येऊन पोहोचलो……. डोंगराच्या कुशीत वसलेली एक छोटीशी वाडी……. इथूनच एक मुख्य वाट गडाच्या पायथ्याच्या पठारापर्यंत जाते……. वाडीतून आलेल्या एका मामांना विचारलं, "गडावर जाणारी वाट कोणती", "याच वाटेनं जा, आनि समोर त्ये मोठ्ठ झाड दिसतंय ना, तितन उजवीकडे वळा"…….अन मामांनी दाखवलेली वाट पकडली. 

साधारण पंधरा मिनिटात त्या दगड मातीच्या प्रशस्त वाटेने एका पठारावर येऊन पोहोचलो. इथेच वावर्ले गावातून येणारी वाट येऊन मिळाली आहे. इथून अर्ध्या तासात एका कातळापाशी येऊन थांबलो. इथे कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात, पण त्या बऱ्यापैकी झिजलेल्या आहेत. पुढे दोन ठिकाणी वाट अगदी कातळकड्यावरून जाते.


या  ट्राव्हर्स नंतर येऊन पोहोचलो पाण्याने काठोकाठ भरलेल्या जोड टाक्यांपाशी……. नितळ, स्वछ पाणी जणू नभांतून बरसलेल अमृत या डोंगर-दगडांनी आपल्यात साठवून ठेवलंय……. मनसोक्त अमृत पिऊन घेतलं अन दोन क्षण विसावलो……


इथून पुढे थोड्या चढाईनंतर साधारण पंधरा-वीस फुटी कातळटप्प्यापाशी पोहोचलो, जिथे सध्या लोखंडी शिडी बसवली आहे. सगळा थ्रिलच निघून गेला आहे राव, असो. शिडी चढून वर गेल्यावर उजव्या बाजूस मोठ पाण्याच टाक लागलं ज्यात आधारासाठी दोन दगडी खांबही आहेत, पण पाणी पिण्यायोग्य नव्हतं. डाव्या बाजूच्या वाटेने गडमाथ्यावर पोहोचलो, आणि समोर उभं होतं निसर्गाच्या कॅनव्हासवर रेखाटलेलं विलोभनीय दृष्य. 

तीनही बाजूस डोंगररांगा……. समोरच मोरबे धरणाचा जलाशय आणि त्याला डोंगर-दऱ्यातून खळाळत येऊन मिळणारे पाणी……. जलाशयाच्या उजव्या बाजूस उभा ठाकलेला इरशाळगड अन सर्वत्र उधळण हिरव्या रंगाची……. आसमंतात दाटलेले नभ……. सोबतीला मन धुंद करणारा रानवारा, क्षणा-क्षणाला बेभान करत जाणारा……. निसर्गाच्या या लोभसवाण्या रूपाने अक्षरशः वेडं लावलं…… सर्वांग सुंदर सह्याद्री, स्वर्गाहून सुंदर सह्याद्री !


​गडमाथा फारच लहान, बहुदा याचा वापर फक्त टेहळणी साठी होत असावा. सोंडाई देवीची मूर्ती वगळता इथे काहीही अवशेष नाहीत. ​गप्पांच्या फडात दोन-अडीच तास कसे गेले कळलंच नाही. पुन्हा एकदा हे सर्व डोळ्यांत साठवून परतीच्या वाटेला लागलो. वेळ बराच होता, म्हणून येताना वावर्ल्याची वाट धरली, राना-वनातून, धबधब्यांतून  पायवाटेने जाणारी आणि अगदीच निर्मनुष्य……. एका ठिकाणी वाट चुकून जंगलात, काट्यात घुसलो. साधारण दीड-दोन तासांनंतर ठाकूरवाडीत पोहोचलो, इथून खाली उतरल्यावर वावर्लेचं धरण लागल, मनसोक्त डुंबून घेतलं. थोडा वेळ थांबून वावर्ल्याकडे निघालो. वाटेत एका मामांना विचारलं, "मामा, कर्जतला जायला एष्टी कुठून मिळेल?", "गावातूनच सरळ बाहेर पडा, एष्टीस्टाप आहे. पन इथन कुटून आलात?", "सोंडाई गडावर गेलो होतो, मामा." "मग इथन रानातून आलात?" मामांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. आम्ही 'हो' म्हणत पुढे सटकलो. दिलीप ला हसत म्हंटल, "निव्वळ मस्ती, दुसर काय?" :) कर्जत- पनवेल हायवेला लागताच मस्त मिसळ-पाव आणि लस्सी चा फडशा पाडला, आणि पुढच्या ट्रेकच्या प्लान्सच्या विचारात गुंतून गेलो.......




सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री

Friday, June 19, 2015

.......मनं पाऊस पाऊस !

​​नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं

अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात……. 

 


​ …….अगदी वेळेवर आलास बघ यावर्षी. तू येण्याआधी हुरहूर लागून राहिली होती बघ, म्हंटल येतोस कि नाही यावेळी तरी लवकर. ऊन 'मी' म्हणत असलेलं. घामाच्या धारांनी तर पुरतं नको करून सोडलेलं. मध्यंतरी तू लांबणीवर जाण्याच्या बातम्या येऊन गेल्या. उगाच मन कावरंबावरं झालेलं, वाटलं तू पुन्हा वाट पाहायला लावणार कि काय?…….

…….आणि अचानक त्यादिवशी अंधारू लागलं, नभ दाटून आलं, थंड वाऱ्याची झुळुक तुझ्या येणार असल्याचा इशारा देऊन गेली. क्षणात बदललेल्या वातावरणाने मन मोहून गेलं, प्रसन्न वाटू लागलं, आणि तू आलास, बरसलास, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर अगदी ठरलेल्या दिवशी शाळा सुरु व्हावी त्याप्रमाणे पाहिल्याच दिवशी हजेरी लावलीस.

हुश्श्श्श्श्श…….प्राणी, पक्षी, माती, माणसं, डोंगर, नद्या, शेतं सगळ्यांनीच एक नि:श्वास टाकला. तुझ्या येण्याने सगळेच सुखावले. सगळ्यांनाच वेड लावणारा तू……. मी तरी तुझ्यापासून अलिप्त कसा राहू? मला तर तू खूप पूर्वीच वेडं लावलयस. आता आठवत नाही नक्की कधीपासून तुझ्या प्रेमात पडलोय. पण 'चातका' सारखा दरवर्षी तुझ्या येण्याकडे डोळे लावून बसतो. आणि तू आलास कि तुझ्या येण्याने वेडा होऊन जातो……. पहिल्या थेंबाने येणारा मातीचा गंध श्वासात भरून घेतो……. चिंब-चिंब भिजून घेतो……. धुक्यात स्वतःला हरवून घेतो……. पाऊस जगून घेतो.

……. तू आल्यानंतर आज तिसऱ्यांदा भिजून आलोय, उगाच वाट फुटेल तिथे भटकून आलोय. थंडगार वारा, रिमझिम कोसळणाऱ्या धारा पुन्हा-पुन्हा अंगावर घेऊन आलोय. पण इतक्यातच मी समाधान थोडचं मानणार? आत्ताशी तर आलायस, 'अभी तो शुरुवात है'. अजून भरपूर भिजून घ्यायचयं. कोसळणारा पाऊस, गरमा-गरम कांदा भजी, चहा आणि सोबतीला चार-पाच टाळकी. …….चल, लागतोच आता पुढच्या प्लान्सच्या तयारीला. …….येतोय पुन्हा: तुझ्यात हरवून जायला.……. !










सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री

Wednesday, June 10, 2015

कातळ-कोरीव पायऱ्यांचा…….कलावंतीण !

​​
.......उंचच उंच कातळ, दऱ्यान मधून भणाणणारा वारा .......माती, झाडा-झुडुपांचा तो मन वेडावणारा गंध .......थकवणारे, घामट काढणारे कातळ-टप्पे .......निसरडी दगड-माती .......उंच कड्यावर बसून न्याहाळलेला नजरेत येईल तिथपर्यंतचा प्रदेश आणि आसमंत.......

.......हे सगळ पुन्हा-पुन्हा अनुभवायचं, डोळ्यांत, श्वासात भरून घायचं .......कुठल्याश्या खोपट्यात बसून पिठलं-भाकरीवर ताव मारायचा आणि मस्त जमिनीवर पाठ टेकायची .......भटक्यासाठी यापेक्षा मोठ सुख ते काय ???

'हापिसातल्या' एसीत अनं घरातल्या पंख्याखाली हे सुख थोडंच मिळणार? .......'उगाच भटकून' (हे घरच्यांच्या भाषेत) बरेच दिवस लोटलेले, आता पुन्हा डोंगर-दऱ्यातं भटकायला जायचं, या नुसत्या विचारानेच उत्साह वाटू लागलेला.......
.......मग काय उचलली ​सँक, अनं वाट चालू लागलो, पुन्हा एकदा त्याच्या दिशेने .......सह्याद्री .......माझा सांगाती !


माथेरान डोंगररांगेत येणारा पनवेल जवळचा कलावंतीण सुळका आणि त्याच्या प्रबळगडावरून दिसणाऱ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या याचं विशेष अप्रूप मनात होत.

.......यावेळी या उंच सुळक्यावरून निसर्गाच विलोभनीय दृष्य न्याहाळायचं, अनुभवायचं हे पक्कं केलं. बरोबर चिनू, निलेशही तयार झाले. स्वप्न्या, तेज, निखिल आणि इतर डोंगरमित्र माणिकगडाकडे निघालेले, अनपेक्षितपणे पनवेल बस डेपोत भेटले. पनवेलहून लाल डब्यात चढलो. तुरळक एक-दोन डोकी, बाकी 'यष्टी' रिकामी, तिघेही ऐसपैस बसलो. साधारण अर्ध्या तासात पायथ्याच्या गावी पोहोचलो.


ठाकूरवाडीत उतरताच मागे दिसला तो उंच, अजस्त्र , विस्तीर्ण पठार असलेला किल्ले मुरंजन म्हणजेच प्रबळगड आणि डाव्या बाजूचा सुळका कलावंतीण. माथेरानच्या सनसेट पॉइंट वरून दिसणारा सूर्यास्त दिसतो, तो याच दोहोंच्या बेचक्यात. 

शहराच्या बऱ्याच जवळ असल्याने गावातल्या बऱ्याचश्या शेतजमिनी 'सेकंड होम' वाल्यांनी कुंपण घालून ठेवलेल्या. 'निसर्गात जा', हे 'या' लोकांनी जरा जास्तच सिरिअसली घेतलंय. :) 

गावातून जाणारा एक बऱ्यापैकी मोठा रस्ता साधारण १५-२० मिनिटात डोंगराच्या पायथ्याशी नेऊन सोडतो. इथं शिव सह्याद्री संस्थेने गडाची माहिती देणारा फलक लावला आहे, जो सध्या बिकट अवस्थेत आहे. इथून पुढचा प्रवास पायवाटेने करायचा.

सक्काळ-सकाळी रानातून सरपणासाठी लाकड गोळा करून, मोळ्या बांधून आणणाऱ्या काही गावकरी स्त्रिया दिसल्या .......अनं आठवली ती शेणाने सारवलेली चूल, सरपण जळतानाचा धूर आणि गंध.......

पुढे प्रबळमाची पर्यंत जाणारी वाट बऱ्यापैकी चांगली आहे, कधी सपाटी, कधी चढाई, तर कधी घामट काढणारी. सूर्यदेव हळूहळू वर येऊ लागलेला, तसा अवघा सह्याद्री आणि चोहोबाजूंचा भूप्रदेश कोवळ्या किरणांत न्हाऊन निघालेला.......जस-जसे वर चढू लागलो तस-तसा लांबवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येऊ लागला.......

थोडं पुढ गेल्यावर दिसल्या त्या कातळात कोरून ठेवलेल्या, शेंदूर फासलेल्या दोन सुंदर मूर्त्या…… एक 'गणेशाची' तर दुसरी 'अंजनी सूताची' .......दोन्ही मूर्त्यांच्या मध्ये दगडात एक घंटा अडकवून ठेवलेली. पायातले शूज काढले आणि मनोमन वंदन केलं. तिथेच जरा पाणी प्यायलो, दोन क्षण थांबून मग निघालो. निघताना मनात आलं, कुणी-कधी कोरल्या असतील इथे या मुर्त्या? .......सध्या तरी माहित नाही.

थोडं चढून पुढे गेल्यावर झाडाच्या सावलीच्या ठिकाणी एक खुर्ची टाकून बसलेला एक तरुण दिसला. न विचारताच त्याने माहिती द्यायला सुरुवात केली, 'प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्थे'तर्फे संकट प्रसंगी पर्यटकांना मदत पोहोचवली जाते. संस्थेकडून प्रत्येक पर्यटकामागे १० रुपये घेतले जातात, त्याची पावतीही दिली जाते. आणि हा निधी आदिवासी गावाच्या विकासासाठी वापरला जातो. एका अर्थाने अशा प्रसंगी मदत पोहोचवण, खरोखरच स्तुत्य आहे.

तिथून पुढे निघालो तो अजून प्रबळमाची यायची होती. मुरंजन च्या पठारामागून सूर्य हळूहळू आपले दर्शन देत होता…….

सणकून भूक लागलेली, प्रबळमाचीत पोहोचताच कांदे-पोह्यावर ताव मारला. चहाने सगळा क्षीण जाऊन तरतरी आली. हा चहा पण काय चीज आहे? कितीही कंटाळा येवो, थकवा येवो, एक घोट घेतला कि हुरूप येतो, नाही? ज्याने हे अजब रसायन शोधून काढलं त्याला खरंच सलाम !
आता इथून पुढे उजवीकडची वाट प्रबळगडा कडे तर डावीकडची कलावंतीण कडे गेलेली. आदल्या रात्री वस्तीला गेलेले काही डोंगरमित्र उतरताना भेटले, औपचारिक ओळख परेड झडली. साधारण अर्ध्या-पाउण तासात दाटीवाटीच्या झाडीतून आणि निसरड्या दगड-मातीतून, चढाईच्या वाटेने हाश-हूश करत प्रबळ आणि कलावंतीणच्या मधल्या खिंडीत येऊन पोहोचलो. समोर पाहतो तर कलावंतीणचा तो उभा अजस्त्र पहाड काळजात धस्स करून गेला. वैशिष्ट्य म्हणजे कातळात खोदून काढलेल्या उभ्या पायऱ्या सहजासहजी दिसत नाहीत.

…….चढाईला सुरुवात केली तशी कातळातल्या या उभ्या पायऱ्यान्नी भुरळच पाडली. पायऱ्या अप्रतीम कोरून काढल्या आहेत, ओबड-धोबडपणा बिलकूल नाही, एक-एक पायरी साच्यामध्ये घडवल्यासारखी. इतक्या अवघड ठिकाणी कुणी आणि कशा खोदून ठेवल्या असतील ? काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अरुंद.
पायऱ्या चढताना एका बाजूला कातळभिंत तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. मागे वळून पहायची सोय नाही, डोकं नक्कीच गरगरणार.

पायऱ्या चढून गेल्यावर थोड्या सपाट जागेवर पोहोचलो. इथून पुढे एक पायवाट शेवटच्या कातळ टप्प्याकडे गेलेली. इथे कोणत्याही पायऱ्या नाहीत, कातळाचे होल्ड्स घेऊन वर पोहोचायचं, रोप असेल तर उत्तम.

आमच्याकडे रोप नव्हता पण आधी आलेल्या एका ग्रुपने रोप लावून ठेवलेला, त्याचा आधार घेऊन अंतिम टप्पा गाठला.
.......सुळक्यावर कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत, माथाही लहान पंचवीस-तीस माणसं बसतील इतका. पण इतक्या अवघड ठिकाणी पायऱ्या खोदून वाट केली आहे, याचा अर्थ इथे नक्कीच काहीतरी असावं, बहुदा जे आज काळाच्या ओघात लुप्त झालंय. पण काय होत नक्की?, कसं होत?, कसं घडवलं असेल? प्रयोजन काय? एक ना अनेक प्रश्न मनात येऊन गेले. ऐतिहासिक कागदपत्र, 'gazetteers' मध्येही याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.



.......इथून नजरेत येत होता तो क्षितिजापर्यंत पसरलेला विस्तीर्ण भूप्रदेश, निळशार आभाळ, पायथ्याची वस्ती, तर तीनही बाजूस पसरलेल्या सह्याद्रीच्या लांबच-लांब पर्वतरांगा, खोल दऱ्या, आणि समोरच विस्तीर्ण पठार आणि घनदाट जंगल असलेला अजस्त्र प्रबळगड. इथल्या भणाणणाऱ्या वाऱ्याने मंत्रमुग्ध करून सोडलं. सह्याद्रीच हे रौद्र-विराट सौंदर्य डोळ्यात भर-भरून घेतलं, वारा पिऊन घेतला, शिवगर्जना दिली आणि तिथेच थोडा वेळ पाठ टेकली .......काही क्षण सगळ काही विसरून गेलो .......हरवलो .......उरलो फक्त सह्याद्री आणि मी.......



सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री

Friday, March 13, 2015

.....आदर्श ???

फाल्गुन कृ. ७, शिवशके ३४१

आज सकाळी ऑफिसला निघायला जरा उशीरच झाला. share ऑटो साठी हि रांग लागली होति. एकदा उशीर झाला कि सगळ्या गोष्टी त्याला पूरकच होऊ लागतात का, असा कधी-कधी प्रश्न पडतो.

​रिक्षातून उतरून sky-walk कडे चालू लागलो. जिने चढून दोन-चार पावलं ​
​पुढे गेलो असेन, तिथे एक व्यक्ती ​
​​ 
कुठलेसे pamplets वाटत होती. ​
​माझ्यापुढेही त्याने ते धरले. मीही ते घेतले आणि बघतो तर,
​घरातून काम करणाऱ्या (work from home) (?) कंपनीची जाहिरात करणारी pamplets होती. काहीही कचरा खाली फेकू नये या नेहमीच्या सवयीने म्हणून मी ते बगेच्या कप्प्यात ठेऊन दिले. चार-पाच पावलं पुढे गेलो तर, तेच pamplets सगळीकडे पडले होते. बहुदा, ज्यांना गरज नाही अशा लोकांनी ते तिथेच sky-walk वरच फेकून दिले होते. मनात आलं ज्या लोकांना गरज नाही ते हे घेतात तरी कशाला? बरं घेतले तरी ठीक, निदान कचरा पेटीत तरी टाकू, इतका साधा विचार डोक्यात येत नाही? पण नाही, इथे पडलीये कोणाला?, आपल्या बापाचं काय जातं? अशाच अविर्भावात काही जण वावरतात.

क्षणात मला गिरिमित्र संमेलनातील अथिति व महाराष्ट्र वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांचे शब्द आठवले. गड-किल्ल्यांवर 'हौशी पर्यटकां' कडून केला जाणारा कचरा याचे कारण या गड-किल्ल्यांवर कुणाची मालकी नाही, असे त्यांचे म्हणणे आहे आणि ते अगदी योग्य आहे. हीच मानसिकता सर्व सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर पाहायला मिळते. कोणीही उठतो आणि वाट्टेल तिथे कचरा फेकतो, कोणी पान खाऊन थुंकतो, कोणी सिगारेट, माव्याची रिकामी pakets, तर कुणी chocolates चे wrappers टाकतो. हे सगळ करणारी लोकं आपल्या घरातही अशीच वागतात का ? नाही ना.  मग रस्त्यांवर, सार्वजिनक ठिकाणीच हे का? हे सगळ आपल्या मालकीच नाही म्हणून? पण खरच असं म्हणता येईल? खर तर ह्या  सार्वजनिक मालमत्ता सर्वांच्याच मालकीच्या  आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या पैशातूनच उभ्या केलेल्या आहेत. मग त्या आपल्या आपणच जपायला नकोत? आणि स्वच्छ सुंदर परिसरात राहायला कुणाला आवडणार नाही? मग कुणीतरी आपल्यासाठी साफ-सफाई करेल याची वाट पहायची का? आणि पुढच्या पिढीसाठी आपण काय आदर्श ठेवायचा याचा विचार को का करायला ?

 - भटक्या योगी

Saturday, February 28, 2015

.....आठवण आयुष्यातल्या अतुट क्षणाची


.....आठवण पहिल्या नजरेची
...आठवण पहिल्या भेटीची
.....आठवण पहिल्या स्पर्शाची
...आठवण दिल्या-घेतल्या वचनांची
.....आठवण ओल्या हळदिची
...आठवण सप्तपदींची
.....आठवण पहिल्या पावलांची
...आठवण वाटलेल्या सुख-दुःखांची
.....आठवण तुझ्या-माझ्या नात्याची
...आठवण आयुष्यातल्या अनमोल दिवसाची
.....आठवण तुझ्या-माझ्या बंधनाची
.....आठवण आयुष्यातल्या अतुट क्षणाची

Thursday, February 26, 2015

…रिटर्न जर्नी

फाल्गुन शु. ८, शिवशके ३४१


करी रोड स्टेशन ला बसलो होतो. "ठाणे स्लो पकडू, आरामशीर बसून जाऊ" असा स्वतःला सांगत सिएसटी कडे जाणार्या गाड्या पाहत होतो. साधारण ९.२५ च्या दरम्यान सिएसटी लोकल आली. जनरल डब्यातून "ती दोघं" उतरली . एक पुरुष एक स्त्री. साधारण  ३५-४० वय असेल. दोघाच्या हातात लाल-सफेद काठी. तो पुरुष त्या स्त्री च्या खांद्यावर हात ठेवून चालत होता . ठाण्याच्या दिशेला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी उभे रहिले. त्या पुरुषाने खिशातून दोन मुठी भरून चिल्लर काढली आणि त्या स्त्री च्या हातात दिले. तिने ते तिच्या पिशवीत ठेवले. (दोघांच्या अंगावर मळलेले आणि थोडे फाटके कपडे होते). मी शांतपणे पाहत होतो. अंबरनाथ लोकल आली. दोघे त्यात बसून गेले. 

माझे काका पण नेत्रहीन होते. घाटकोपर स्टेशनला खेळणी विकायचे. अधून मधून ठाण्याला आमच्या घरी पण यायचे. दिसत नसून ते येतात कसे याचा मला नवल वाटायचं. नंतर त्यांना  बस stop वर सोडायला मला जाव लागायचं. मला लाज वाटायची त्यांना घेऊन जायला. (कालांतराने मला जाणवलं कि मी चुकीचा होतो)  ते तंबाखू खायचे आणि थुकायचे रस्त्यात. जर चुकून कोणाच्या अंगावर थुकले  तर. मी ओरडायचो त्यांना. "अस करू नका ".  त्यांच्या हातात घड्याळ होते. त्यांना वेळ कळायची. नोटा पण हाताने चाचपून कळायच्या. 

आज ते हयात नाही. आज इतर नेत्रहीन भिक मागताना  पाह्तो तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांनी कधी कोणासमोर हात नाही पसरले. स्वतः कमावले. परीस्थितीशी सामना केला. 

विचारांच्या तंद्रीत होतो तितक्यात परत सिएसटी लोकाल आली पुन्हा तेच दोघे समोरून उतरले. आणि पळत मागच्या डब्यात चढले. मी आश्चर्यचकित. लोकल गेली. पुन्हा विचारांची तंद्री. ठाणे लोकाल काही येत नव्हती. बदलापूर ट्रेन आली. पुन्हा त्यातून तेच दोघे उतरले. परत पळत मागच्या डब्यात. मी आवक होऊन पाहत बसलो. "काय चाललय काय? मला भास होतोय कि हे खरच घडतंय?"… 

पोटासाठी किती हि धावपळ! वाईट वाटलं. पुन्हा सिएसटी लोकाल आली. पुन्हा तेच दोघे उतरले आणि पळत मागच्या डब्यात चढले. आता मला कळून चुकलं कि "त्या दोघांची  परळ-चिंचपोकळी -परळ…रिटर्न जर्नी सतत चालू होती. पोटासाठी.… 


(शेवटी मी टिटवाळा लोकल पकडली…परळ स्टेशन ला पुन्हा तशीच दोघे नेत्रहीन चढले. एक पुरुष एक स्त्री. पुरुषाच्या गळ्यात एक ढोलकी होती आणि एका हातात घुंगरू पण होते. सुरात त्याने गाणं सुरु केला आणि ढोलकी वाजवू लागला. आणि ती स्त्री लोकांपुढे हात पसरून पैसे गोळा  करू लागली… पोटासाठीच…)

 - प्रविण शिंदे 

Tuesday, February 24, 2015

६.५४ ची बदलापूर फास्ट...

फाल्गुन शु. ६, शिवशके ३४१


"६. ५४ ची बदलापूर फास्ट ट्रेन पकडायची आहे. मिळेल ना?" 
स्वतःलाच प्रश्न विचारात घाईघाईत गर्दीतून चालत होतो (पळतच होतो)… 
दादरच्या मेन ब्रिजवर चिक्कार गर्दी…
"कुठून येतात एव्हडी लोक?" वैतागून स्वताशीच पुटपुटत… 
इतक्यात गर्दीत ती दिसली, हळूहळू चाचपडत चालत होती… 
तिला पाहिल, पण ट्रेन पकडायची होती… "जाऊ दे! जाईल ती कशीतरी"… 
पुढे गेलो, परत मागे आलो…"कहा जाना है आपको?"… मी विचारलं… 
"central line पे platform एक पे middle ladies"… मी तिचा हात धरून हळू हळू चालू लागलो, 
वय साधारण ३०-३५ च्या दरम्यान, निळी साडी, काखेत bag, हातात सफेद लाल काठी… 
"कहा जाना है आपको?"… मी विचारल… "मै ट्रेन मे सेल करती हुं,  middle ladies अच्छा पडता है स्टेशन पे उतरके घर पे जाने को". नाव नाही विचारल, कुठे राहते नाही विचारलं… अश्या कितीतरी रोज या मुंबईत आपल्या अपंगत्वावर मात करत उदरनिर्वाह करत असतील, किती त्रास होत असेल त्यांना. पण निर्धाराने, हिमतीने सामोर्या जातात. आपण आपला थोडासा वेळ काढून त्यांना मदतीचा हात देऊ शकतो ना?
शेवटी middle ladies आला. हात सोडून तिला सांगितल "आ गया middle ladies"… 
"thank you भैय्या" ...ती … 
"वेलकम" म्हणत मी पळत सुटलो ७.१० ची कल्याण fast पकडायला…

 - प्रविण शिंदे 

Friday, February 20, 2015

शिवजयंती… !

​फाल्गुन शु. २, शिवशके ३४१​

"आज शिवजयंतीच काय?". 
"अरे हि शिवजयंती आपली नाही, तिथीने येते ती आपली", एक संवाद. 
    
     खर तर शिवजयंतीच्या तिथी आणि तारखेच्या वादात मला पडायचं नाहीये. प्रश्न हा आहे कि शिवजयंती कोणतीही असो त्यादिवशी आपण नक्की काय करतो किंवा काय करायचं ठरवतो ? तर facebook आणि whats app वरून भरभरून शुभेच्छा देतो. काही यापुढे जाऊन मिरवणुका काढतात, पूजा करतात , DJ लावतात. पण प्रत्यक्ष शिवरायांच्या विचारांचा आदर कोण ठेवतो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो

     शिवरायांनी स्वराज्य निर्माण केल, रयतेला पोटच्या लेकरासारख सांभाळल, जात-भेद मोडीत काढले, अन्यायाला स्वराज्यात थारा दिला नाही. आज आपण काय करीत आहोत ? जय शिवराय बोलून, गाड्यांवर stickers लावणे, पिळदार दाढी-मिश्या ठेऊन कपाळी गंध लावणे म्हणजे आपण शिवकार्य करतोय का ? हे करण्यात काही गैर नाही, पण आपण शिवरायांच्या विचारांच अनुकरण करत आहोत का? खरंच काही समाज उपयोगी कार्य करत आहोत का? आज आपण पाहतो आपल्या आजूबाजूला कितीतरी असे लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, पण आपण त्याकडे किती लक्ष देतो ? खूप कमी लोक आणि संस्था ज्या प्रत्यक्ष गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे, गरजू व्यक्तींना वेळोवेळी मदतीचा हात देण्याचे काम करतात. अशा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करतात अस मला वाटत. ​आपण निदान वर्षातल्या या दिवशी तरी अशा सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतो, नाही का ?

- भटक्या योगी